मॉम्मी, मी काय
करू?
भाग 2
सातव्या
दिवशी अनुष्काबरोबर खेळायला अप्पू हत्ती आला. त्याच्या बरोबर ग्रोगोर वाघोबला, मंकू
माकडूदादा, टुन्टिन हरीण, पंचरंगी पोपट, नीळू मोर, आणि फझी ससा हे सगळे जंगलातून आले.
सोन्या कुत्रा आणि ब्लूमिनी मनीमाऊ हे पण आले. सगळे पार्कमधे जाऊन खूप खेळले. तो
दिवस मजेत गेला. संध्याकाळी ते घरी निघाल्यावर अनुष्का म्हणाली, “तुम्ही
जाऊच नका. नेहमी इथंच राहा.”
अप्पू म्हणाला, “अगं पण घरी आमची आई वाट बघत असेल. आम्हाला
आमच्या घरी जायलाच हवं.”
“मग रोज खेळायला माझ्याकडे
या.”
अप्पू म्हणाला, “रोज कसं येता येईल? इतकं लांब यायला लागतं.
शिवाय आम्हाला आमची कामं असतात.”
“तुम्हाला कसली कामं?”
“मला सोंडेनं गवत खायची, झाडाच्या फांद्या तोडायची, पाण्यात
डुंबायची आणि अंगावर चिखल उडवून घ्यायची प्रॅक्टीस करायची असते; ग्रोगोरला आणि
ब्लूमिनीला उड्या मारायची, झडप घालायची, पकडापकडीची; फझीला उड्या मारायची; टुन्टीनला
टुण् टुण् उड्या मारायची, धूम पळायची प्रॅक्टीस करायची असते.” अप्पू म्हणाला.
“मला भुंकायची, जोरात पळायची, वास ओळखायची आणि राखण करायची
प्रॅक्टीस करायची असते, मंकूला लोंबकाळायची, या झाडावरून त्या झाडावर उड्या
मारायची प्रॅक्टीस करायची असते.” सोन्या म्हणाला.
“मला लांब उडायची आणि फळं शोधायची आणि नीळूला पिसारा
फुलवायची आणि नाचायची प्रॅक्टीस करायची असते.” पंचरंगी म्हणाला.
“शिवाय प्रत्येकाला घरी कामं असतात. आई-डॅडीला मदत करायची
असते, भावा-बहिणींशी खेळायचं असतं.” अप्पू म्हणाला.
“तुला नसते का कशाची प्रॅक्टीस करायची?” मंकू म्हणाला.
अनुष्का म्हणाली, “मला कंटाळा येतो. आणि मी वीक आहे ना!”

“छे छे! मला माहिती आहे तू
खूप स्ट्रॉंग आहेस. पण तुला प्रॅक्टीसचा कंटाळा येतो. आणि मला हे कधी येईल, ते कधी
येईल, अशी घाई होते. मला माहिती आहे, तुला खूप गोष्टी करायला आवडतात. मागे मालविका
आत्या आली होती तेव्हा तू एक प्रोजेक्ट किती छान केला होतास. शिवाय तुला क्राफ्ट
करायलाही आवडतं.”
“मला आत्ताच्या आत्ता प्रोजेक्ट
करायचा आहे. मला मालविका आत्या आत्ताच्या आत्ता हवी.”
“बघ, अशी तू सगळ्याची घाई
करतेस. नाहीतर तेच तेच करत बसतेस. मग तुला कशाची मजाच वाटत नाही. त्यापेक्षा तू या
सुट्टीत काय काय करायचं हे आधी ठरव.”
“मला नं, खरं, ताकद देणार्या परीची गरज आहे.” अनुष्का
म्हणाली.
“हो! तिचं नाव ’पॉवरिंग’. तिला बोलावलं की ती येते. आपण
आपला प्रॉब्लेम सांगितला की ती जादूनं आपल्या अंगात शिरते आणि एक महिनाभर राहाते.
मग आपल्याला रोज थोडी थोडी शक्ती येते.”
“पण तुझा प्रॉब्लेम काय आहे?” मंकू.
“मला नाही माहीत. पण माझ्या डॅडीला माहितीयै. तो म्हणतो,
परी अंगात शिरल्यावर रोज 2 कप दूध, एक अंडं आणि 1 वाटी पालेभाजी खाल्ली की 1
महिन्यात शक्ती येते.”
“पण मी तर अंडं खात नाही. मी शाकाहारी आहे ना!” अप्पू आणि
टुनटिन म्हणाले.
“पण अप्पू, तुला तर ताकदीची गरजच नाही. आणि अंड्याऐवजी 1
वाटी उसळ खाल्ली तरी चालते.”
“वॉव् ! मग ठीक आहे.” टुनटिन.
“मी तिला उद्या सकाळी बोलावणार आहे. माझ्याकडे तिचा फोन
नंबर आहे ना!”
“ओके! तू तिला उद्या बोलाव आणि तुला ताकद येतेय असं वाटलं
तर आम्हालाही तिचा फोन नंबर दे.” मंकू.
“ओके! बऽऽरं. पण तुम्ही पुन्हा खेळायला कधी याल?”
अप्पू हत्ती म्हणाला, “पुढच्या आठवड्यात.”
मग सगळे आपापल्या घरी गेले.
संध्याकाळी डॅडी घरी आल्यावर अनुष्का म्हणाली, “सगळे
मित्र गेले. माझ्याबरोबर खेळायला कुणीच नाही.”
डॅडी म्हणाला, “त्यांना आपापल्या घरी जायला नको का?”
“पण मला कंटाळा येतो. अप्पू म्हणाला, सुट्टीत काय काय करायचं
हे आधी ठरव. मी खूप गोष्टी करायचं ठरवलं. पण मला कंटाळाच येतो आणि काही करताच येत
नाही.”

डॅडी म्हणाला, “कारण तू दिवसभर एकच काहीतरी करत बसतेस आणि मग कंटाळतेस. तू
दिवसात निरनिराळ्या गोष्टी थोडा थोडा वेळ कर. म्हणजे तू दमणार पण नाहीस आणि कंटाळणार
पण नाहीस.”
“पण माझ्या अंगात शक्तीच नाहीयै ना! मी उद्या ’पॉवरिंगला’
बोलावणार आहे.”
“हंऽऽ! मला माहितीयै. तुला एक गंमत सांगू का! कुण्णाला
माहीत नाही आणि तू पण कुणाला सांगू नकोस.”
“सायाला पण?”
“सायाला फक्त सांग. बाकी कुणाला नाही.”
“ओके! सांग.”
“खरं म्हणजे नंऽऽ, तुझी मॉम्मी म्हणजेच ’पॉवरिंग’. आणि तिचा
तर फोन नंबर तुझ्याकडे आहेच.”
“खंरंऽऽ?”
“मग? मी तुला खोटं सांगेन का? तीच तुला मदत करेल. पण
त्यासाठी प्लॅनिंग करायला हवं.” डॅडी म्हणाला.
“मला नाही प्लॅनिंग करता
येत.”
“पण तुझ्या मॉम्मीला, म्हणजे ’पॉवरिंगला’ येतं ना! तिला
प्लॅनिंग करता येतं, छान आणि पौष्टीक स्वयंपाक करता येतो, तुमच्या बरोबर खेळता
येतं, तुम्हाला गोष्टी सांगता येतात, तुम्हाला शिकवता येतं. तिला तर सगळंच येतं. शिवाय
तुम्हाला कधी काय हवंय तेही तिला बरोब्बर कळतं. ती तुला मदत करेल! तिलाच फोन कर.”
“घरातल्या घरात?”
“मग? तू आता अशीच तिच्याकडे गेलीस तर ती नेहमीची मॉम्मी
असेल. पण तू तिला ’पॉवरिंग’ म्हणून फोन केलास तर ती ’पॉवरिंग’ असेल. मी पण काही
काही वेळा तिला फोन करतो.”
“तू पण?” अनुष्कानं डोळे मोठ्ठे करून विचारलं.
_ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _
भाग 3 – पुढच्या
शनिवारी




No comments:
Post a Comment