मॉम्मी, मी काय
करू?
भाग 1
उन्हाळ्याच्या
सुट्टीची अनुष्का अगदी वाटच पाहात होती. बर्फ वितळला होता, थंडी पळाली होती आणि
हवा ऊबदार झाली होती. उन्हाळा सुरू झाला होता. वसंत ऋतू आला होता.
झाडांना
नवी पालवी आली होती, नवं गवत उगवलं होतं आणि सगळीकडे हिरवं-गार झालं होतं. सगळीकडे
रंगीबेरंगी फुलं फुलली होती आणि हवेत त्यांचा वास पसरला होता. पण अजून शाळा चालू
असल्यानं अनुष्काला बाहेर भटकायला आणि खेळायला मिळालं नव्हतं.
शिवाय
इंडियातून आजी-आबाही आले होते. पण अनुष्काला त्यांच्याबरोबर गप्पा मारायला,
खेळायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला पण वेळ मिळाला नव्हता.
पण
मंगळवारी शाळा संपली आणि बुधवारपासून अनुष्काची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. हे
ऽऽऽ आता मज्जाच मज्जा!

एक दिवस अनुष्कानं आजी-आबाकडून खूप लाड करून घेतले. ती सारखी आबाच्या मागे मागे धावली, त्याच्या पाठीवर बसून घोडा-घोडा खेळली आणि त्याच्याकडून गोष्टी ऐकल्या. तिनं आजीकडून भरवून घेतलं आणि तिच्या कुशीत झोपली.

एक दिवस, ‘मी वर्षभर खूऽऽऽप अभ्यास केला नंऽऽ, माझ्या मऊ मेंदूला मुंग्या आल्या, आता मी दमले, कोमेजले’, असं म्हणत तिनं लोळून विश्रांती घेण्यात घालवला.


एक दिवस तिनं ’सिक’ पडून बघितलं. तिला बारीक ताप वाटला, थोडी कसकस वाटली, सर्दीनं डोकं जऽऽड झाल्यासारखं वाटलं, तोंडाची चव गेली, थोडा खोकला वाटला आणि मळमळतंय् गरगरतंय् असं वाटलं.

एक दिवस तिला खूप कंटाळा आला. मग तिनं तिची धाकटी बहीण सायाची विनाकारण खोडी काढली, तिला त्रास दिला आणि मग तिनंच मला ढकललं म्हणून कांगावा केला.

एक दिवस तिला
काहीच पटेना, काहीच तिच्या मनास येईना, कोणाचंच आपल्याकडे लक्ष नाही, असं म्हणून तिनं
उगीचच चिडचीड आणि रडारड केली.
मग सातव्या दिवशी तिनं मॉम्मीच्या मागे दिवसभर खूप भुणभूण केली, “मॉम्मी, मी बोअर झाले. आता मी काय करू?”
मॉम्मी म्हणाली, “अगं अनुष्का, आबांनी तुझ्यासाठी नवी पुस्तकं आणली आहेत, ती वाच. किंवा चित्रं काढ.”
डॅडी
म्हणाला, “नवी
गाणी ऐक किंवा ‘सिंथ’ वाजव.”
आबा म्हणाले, “आपण पोहायला जाऊया का?”
आजी म्हणाली, “तू सायाची दीदी आहेस ना? मग तिच्याबरोबर खेळ, तिला काहीतरी
शिकव.”

मग एक दिवस दिवसभर अनुष्कानं पुस्तक वाचलं आणि तिला कंटाळा आला.ती म्हणाली, “ही पुस्तकंच चांगली नाहीत. काही पुस्तकांत चित्रंच नाहीत. ज्यांत आहेत त्यांतली चित्रंच चांगली नाहीत. माझ्या आवडीच्या गोष्टीच त्यांत नाहीत.”

दुसर्या दिवशी
दिवसभर तिनं चित्रं काढली आणि ती मॉम्मीला म्हणाली, “मॉम्मी, माझी चित्रं चांगली येणारच नाहीत. माझा
कागद, ब्रश आणि रंग भिकार आहेत”
“का?
चांगले तर आहेत.”
“मला तुझा
कॅनव्हास आणि तुझे रंग हवेत.”
मॉम्मी
म्हणाली, “मी
आधी हेच ब्रश आणि रंग वापरत होते. मला आधी चित्रं चांगली काढता यायला
लागली आणि मग मला आता हा कॅनव्हास आणि हे रंग मिळाले.”

तिसर्या दिवशी दिवसभर तिन ‘सिंथ’ वाजवला आणि ती डॅडीला म्हणाली, “डॅडी, या सिंथमधून चांगला आवाजच येत नाही, माझ्या आवडीची गाणीच त्यात नाहीत.”

डॅडी
म्हणाला, “गाणी
सिंथमधे नसतात. ती आपल्या डोक्यात असतात. ती वाजवायला शिकायला हवं. त्याला रोज प्रॅक्टीस करायला पाहिजे, म्हणजे आपल्या डोक्यातलं, आपल्याला हवं ते गाणं त्यातून वाजवता येईल.”
चौथ्या दिवशी ती आबांबरोबर पोहायला गेली. आल्यावर आबा म्हणाले, “काय? मजा आली की नाही? तुला पाण्यात खेळायला खूप आवडतं ना?”
अनुष्का म्हणाली, “पण माझं डोकंच भिजतं आणि पाय वरच येत नाहीत.”
आबा म्हणाले, “आपण रोज पोहायला जाऊ. तू रोज पाय मारलेस की चार दिवसांत ते
वर यायला लागतील आणि रोज हात मारलेस की पुढे जाशील. म्हणजे पोहायला आलंच.”
पाचव्या दिवशी तिनं सायाबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणाली, “आजी, साया सारखी माझ्याशी भांडते. माझ्या हातातून खेळ हिसकावून घेते.”
आजी
म्हणाली “अगं, ती अजून लहान आहे. तिला कळत नाही.
पण तू मोठी, तिची दीदी आहेस ना, मग तिच्या कलानं खेळ.”
अनुष्का
म्हणाली, “कलानं म्हणजे काय? आणि मी नेहमीच मोठी
असणार आणि ती छोटीच राहाणार.”
मग
सहाव्या दिवशी तिनं मॉम्मीच्या मागे पुन्हा दिवसभर खूप भुणभूण केली, “मॉम्मी, आता मी काय करू?”
अनुष्का
म्हणाली, “पण
शाळेला तर अजून २ महिने सुट्टी! मग आता मी काय करू? आता मी बोअर झाले.”
_ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _
भाग 2 – पुढच्या
शनिवारी



No comments:
Post a Comment