ASAE

ASAE
AnSaAaEv in Wonderland

Friday, April 8, 2016

गुढीपाडवा

                           गुढीपाडवा
                            
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे मराठी महिन्याप्रमाणं नवीन वर्षाचा पहिला दिवस. आजपासून जुनं वर्षं संपून नवं वर्ष सुरु होणार.

त्या नव्या वर्षाचं स्वागत करण्य़ासाठी आपण घरावर उंचावर गुढी उभारतो. गुढी म्हणजे एका लांब बांबूला एक साडी किंवा रेशमी वस्त्र, त्यावर साखरेची गाठी, त्यावर रंगीत फुलांचा हार आणि हिरवीगार कडूलिंबाची एक छोटीशी फांदी एकत्र बांधायची. त्यावर तांब्याचा एक तांब्या पालथा ठेवायचा. अशी ही गुढी घराच्या वर दिसेल अशी सकाळी लवकर उभारायची. गुढी म्हणजे एक प्रकारचा झेंडाच आहे.
नवीन वर्षाची सुरुवात नेहमी चांगल्या, मंगलमय गोष्टींनी करावी. तसं केल्यानं आपलं सर्व वर्षच सुखासमाधानात जातं. म्हणून ह्या गुढीपाडव्याच्य़ा दिवशी सकाळी लवकर उठून, अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. जिथं गुढी उभारायची ती जागा स्वच्छ करून घ्यावी. तिथं छानशी रांगोळी काढावी. त्यानंतर घरातील सर्वांनी एकत्र येऊन गुढी उभारायची. लहानांनी मोठ्यांना नमस्कार करायचा आणि स्वतःला आणि इतरांनाही उपयोगी होईल अशी एखादी गोष्ट वर्षभर नेमानं करण्याचं ठरवायचं.
नंतर सगळ्यांनी कडूलिंबाचं पान खायचं अशी पद्धत आहे. खूप कडू लागलं तरी ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून खरं तर ते रोज खावं.
आपल्या घराच्या परिसरात जर एखादं जरी कडूलिंबाचं झाड असेल तर त्याचे खूप फायदे असतात. त्यामुळं हवा शुद्ध रहायला मदत होते. त्याची पानं धान्यात ठेवली तर धान्याला कीड लागत नाही, ते वर्षभर छान हिरवं असतं आणि त्याची सावली छान पडते. वर्षभरातील प्रत्येक सणाच्या निमित्तानं आपल्याला आपल्या परिसरातील, आपल्याच पर्यावरणाचा भाग असलेल्या आणि उपयुक्त एकेका झाडाची अशी ओळख होते. त्यामुळं त्या त्या झाडांचं महत्व कळतं आणि ती झाडं टिकविण्याचा आपण प्रयत्न करतो.
या दिवशी एक वर्षाच्या आतील मुलांच्या गळ्यातही एक एक गाठी घालण्याची पद्धत आहे. त्या मुलाच्या आयुष्यातील त्या पहिल्याच नवीन वर्ष सुरू होण्याच्या दिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि मुलाचं कौतूक म्हणून. शिवाय गाठी म्हणजे साखरेच्या पदकांची माळ असल्यानं ती मुलांनी खाल्ली तरी चालते व गोड असल्यानं मुलांनाच का, मोठ्यांनाही आवडते.











गुढीपाडव्याला जेवायला काहीतरी गोड केलेलं असतं. घरातील सगळ्यांनी एकत्र येऊन प्रथम जेवायला जे जे काय केलं आहे त्याचा देवाला नैवेद्य दाखवायचा. जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांना आणि माणसांना नेहमी पुरेसं आणि पौष्टीक अन्न मिळावं अशी प्रार्थना करायची. नंतर सगळ्यांनी एकत्र बसून जेवण करायचं.
नंतर संध्याकाळ झाली की गुढी उतरायची. असा आपण गुढीपाडवा साजरा करतो.

संपूर्ण वर्षातील काही महत्वाचे जे दिवस असतात त्यांपैकी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा हा महत्त्वाचा व शुभदिवस समजला जातो. म्हणून अनेक जण या दिवशी नव्या गोष्टींची सुरुवात करतात, नवीन कामं सुरू करतात, नव्या घरी राहयला जातात आणि नव्या गोष्टी खरेदी करतात. आपलं जुनं कॅलेंडर म्हणजे ’पंचाग’, तेही ह्या दिवसापासून नवीन वर्षाचं नवं आणून वापरतात. त्या पंचागातून आपल्याला तिथी, वार, नक्षत्र, अशा अनेक गोष्टी समजतात. त्यात या वर्षातील पाऊस, वादळे, दुष्काळ यांचे अंदाज देखील असतात.

असा हा नववर्षाचा पहिला दिवस, ’गुढीपाडवा’. जुनं मागे टाकून नवीन सुरू करण्याचा शुभदिवस.



 

No comments:

Post a Comment