चादर चादर
एक आहे चादर
किती किती मऊ
मला तर वाटतं
सारखं झोपूनच राहू
गुलाबी गुलाबी रंग
मऊसूत अंग
घर आहे माझं
भला मोठा पलंग
छोट्या छोट्या उशीवर
मम्मीच्या मांडीवर
कुठे ही झोपले तर
तू माझ्या अंगावर
खूप खूप आवडतेस
सारखी सारखी आठवतेस
बाबाच्या कुशीत गोष्ट ऐकताना
सारखी जवळच लागतेस
चादर चादर
कीती किती मऊ
एकच काळजी मला
स्कूल मध्ये कशी नेऊ?
सुलू आजी
__________ *** ___ *** ___ *** __________
अनुष्काचा वाढदिवस -
सिंगापूरहून आले आजी आणि आबा
सिंगापूरहून आले आजी आणि आबा
अनुष्कासाठी आणला फ्रॉक नवा नवा
प्रसादमामा आला मुंबईहून
भला मोठा टेडी आला घेऊन
काका आणि आत्या बाल्टीमोरहून आले
येताना उकूलेले घेऊन आले
रंगीत दिव्यानी सजला हॉल
बलूनचा लावला मोठा बॉल
अंकल आंटी रिया ही आले
अनुष्काचे सगळे फ़्रेंडही जमले
बाबाने आणला चॉकलेट केक
अनुष्का म्हणाली “दे ना एक”
“जरा थांब” मम्मी म्हणाली
त्या मध्ये सुंदर कॅंडल लावली
चांदीच्या निरांजनाने सजलय ताम्हण
मम्मीने केलं अनुष्काला औक्षण
लाल लाल रिबन लावून आणली सुरी
सगळी सगळी झाली तयारी
अनुष्काने कापला पटकन केक
बाबाने काढला फोटो सुरेख
काकाने वाजवलं सिंथवर गाणं
अनुष्काच्या डोळ्यात दिसलं चांदणं
सुलू आजी
__________ *** ___ *** ___ *** __________


No comments:
Post a Comment