मॉम्मी, मी काय
करू?
भाग 4
मग ’पॉवरिंग’ मॉम्मी आणि अनुष्कानं मिळून रोज करायच्या
गोष्टींचं आणि एकूण सुट्टीच्या २ महिन्यांत करायच्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं.
अनुष्का म्हणाली, “हे तर एकदम सोप्पं आहे.”
मॉम्मी म्हणाली, “हे झालं प्लॅनिंग. पण महत्त्वाचं आणि अवघड म्हणजे
प्रत्यक्ष कामाला लागणं, प्लॅनिंगप्रमाणे कामं आटोपणं आणि कामं करत राहाणं.”
“ओके. मग मी आता उद्यापासून कामाला लागते.”
“उद्यापासून का? आत्तापासून का नाही?”
“आत्ता प्लॅनिंग करून मी दमलेय् ना. शिवाय आता थोड्या
वेळात जेवायचं, मग झोप, मग संध्याकाळ होईलच, मग सायाबरोबर खेळायला नको? मग जेवण,
झोप. तोपर्यंत उद्याचाच दिवस आला.”
“उद्या कधीच येत नाही. उद्या उद्या करताना सुट्टी संपून
जाईल आणि पॉवरिंगची जादू पण संपून जाईल.”
“हं!” अनुष्कानं
घड्याळात पाहिलं, मग टाईमटेबल बघितलं आणि ती म्हणाली, “येस्ऽऽऽ! आता मी कामाला
लागणार. आता चित्राची वेळ, म्हणजे आता मी जेवणाची वेळ होईपर्यंत चित्रं काढते.”
पहिल्यांदा तिनं एव्हरेस्ट चढणार्या सायाचं चित्रं काढलं. मग
चित्रं काढण्यात अनुष्का इतकी रंगून गेली की जेवणासाठी मॉम्मीनं दहा हाका मारल्या
तरी तिला ऐकूच आल्या नाहीत.
एक आठवड्यानं अप्पू हत्ती आणि इतर सगळे मित्र आले तेव्हा
अनुष्का त्यांच्याबरोबर सायकलवरून बागेत गेली. बागेत ते खूप फुटबॉल खेळले. दुपारी
मॉम्मीनं दिलेला डबा सगळ्यांनी खाल्ला.

मग अनुष्कानं सगळ्यांना ’पॉवरिंग’ परीची एक वेगळीच छान
गोष्ट सांगितली. ’पॉवरिंगच्या’ मदतीमुळे अप्पू हत्तीसुद्धा हिमालयात ट्रेकिंगला
कसा जातो आणि बर्फावरून कसा घसरतो त्याची ती गोष्ट होती. सगळ्यांना, मुख्य म्हणजे
अप्पूला, ती गोष्ट फारच आवडली. गोष्ट ऐकताना, तो जणू बर्फावरून खरोखरच घसरतो आहे, असा
तो खुदूखुदू हसत होता.
थोडी विश्रांती घेऊन झाल्यावर मग सगळे पकडापकडी खेळले. मग
पळण्याची आणि सायकलची शर्यत लावून झाल्यावर सगळे दमून घरी आले.
घरी मॉम्मीनं सगळ्यांच्यासाठी छान आलू पराठे, मेथी-मटार-मलई
आणि दहीवालं पंचरंगी सॅलेड असा बेत केला होता. तो खात खात सगळ्यांनी अनुष्कानं
काढलेली चित्रं बघितली. खाणं झाल्यावर अनुष्कानं त्यांना एक गाणं पण म्हणून दाखवलं.
सगळे म्हणाले, “वॉव! अनुष्का, गेल्या आठ्वड्यात आम्ही आलो होतो तेव्हा तू
किती चिडचीड करत होतीस आणि एकाच आठवड्यात तू न दमता किती सायकल चालवलीस आणि किती
गोष्टी केल्यास!”
तेवढ्यात सगळ्यांना अनुष्काच्या टेबलावर प्लॅनिंग केलेला
आणि टाईमटेबलचा कागद दिसला. सगळे म्हणाले, “अरेऽऽ! ती ’पॉवरिंग’ परी तुला खरंच भेटलेली
दिसते.”
अनुष्का म्हणाली, “डॅडीनं मला प्लॅनिंग करायला सांगितलं आणि
मॉम्मीनं मला प्लॅनिंग करून दिलं. मी प्लॅनिंगप्रमाणे गोष्टी केल्या आणि खूप
प्रॅक्टीस केली. आणि हे करताना मला इतकी मजा आली.”
“ए, तू मला पॉवरिंगचा फोन नंबर देणार होतीस.” मंकू म्हणाला.
“डॅडी म्हणतो मॉम्मी म्हणजेच ’पॉवरिंग’.”
“मग तिचा फोन नंबर दे ना.”
“तिचा का? तुझी मॉम्मी म्हणजे पण ’पॉवरिंग’ असणार. तिचा फोन
नंबर तुझ्याकडे असणारच. तू तिला फोन कर.”
“घरातल्या घरात?”
“मग? तू असाच तिच्याकडे गेलास तर ती नेहमीची मॉम्मी असेल.
पण तू तिला ’पॉवरिंग’ म्हणून फोन केलास तर ती ’पॉवरिंग’ असेल.” अनुष्कानं डॅडीचंच वाक्य मंकूवर फेकलं.
“खरंच की!” सगळेच एकदम म्हणाले.
मग घरी गेलं की आपापल्या मॉम्मीला फोन करायचं सगळ्यांनी
ठरवलं.
“डॅडी म्हणतो, मॉम्मी म्हणजेच ’पॉवरिंग’, मॉम्मी म्हणते ’टीचर’
म्हणजे पण ’पॉवरिंग’ आहेत आणि टीचर म्हणतात सूर्य म्हणजे शक्तीदेव – ’पॉवर-गॉड’. पण आता
मला कळलंय, हेल्दी फूड, व्यायाम आणि प्रॅक्टीस म्हणजेच ताकद देणारी परी, ’पॉवरिंग’.”
--- --- ---
मग सुट्टीचे २ महिने छान मजेत, सायाबरोबर आणि
मित्रमंडळींबरोबर खेळण्यात, दंगा करण्यात, गाणी-गोष्टी ऐकण्यात, सिंथवर गाणी
वाजवण्यात, चित्रं काढण्यात, पोहण्यात कसे संपले ते कळलंच नाही. पण सुट्टी संपताना
अनुष्का अनेक गोष्टींत तरबेज झाली होती आणि तिची ताकदही खूप वाढली होती. नंतर ती
कधीही, “मी अशक्त आहे”, “मी दमले” “हे मी उद्या करते” आणि “मला कंटाळा आला”,
असं म्हणाली नाही.
_ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _


No comments:
Post a Comment